ओखी
४ डिसेंबर २०१७
आज तारीख आहे १९ एप्रिल २०१८. साधारण एक वर्षापूर्वी आम्हाला समजले की आम्ही आई बाबा होणार आहोत. वर्षाने जेव्हा मला हि बातमी दिली तेव्हा मी अगदी सुन्न झालो. बायको इतक्या आनंदात होती... तिला रडू आवरत नव्हते आणि मला हा आनंद इतका अनपेक्षित होता की मी काही री-ऍक्शन देऊ शकलो नव्हतो. खूप वाट बघायला लावणारी गोष्ट तुमच्या समोर आली तर काय होईल... तसेच माझे झाले... एकदम सुखद धक्का... या गोष्टीला बरोबर एक वर्ष झाले. त्यानंतर नऊ महिने कसे जातील.. टेन्शन, डॉक्टर, तपासण्या, आहार... गमतीत मी कळशी वगरे उचलायची नाही असे चिडवू लागलो... एकदमच दिवस बदलून गेले... आणि चुटकी वाजवल्याप्रमाणे पाहता पाहता ४ डिसेंबर कधी उजाडला हे कळलेही नाही.
त्या दिवशी माझी किवा वर्षाची काय परिस्थिती होती, हे सांगणे खूपच कठीण आहे. आदल्या दिवशी डॉक्टरांनी उद्या ऍडमिट व्हा असे सांगितले तेव्हापासून ते दवाखान्यात ऍडमिट होईपर्यंत नुसते धडधडत होते. रात्री झोपच नाही... सकाळी केव्हातरी झोप लागली आणि लगेच निघायची वेळ !! हा सगळा प्रवास शब्दात मांडणे माझ्यासाठी खरंच खूप अवघड आहे पण लिहायचा प्रयत्न करतोय.
बाबा !! कसा वाटतोय शब्द! भारी ना ... सर्वांनाच हा शब्द आईप्रमाणेच प्रिय. मला या शब्दाची जादू कळली ४ डिसेंबर २०१७ ला. एक सुंदर इवलीशी परी साधारण सकाळी ११.३० ला माझ्या हातामध्ये माझ्याकडे किलकिल्या नजरेने पाहत होती. मधेच झोपत होती. इतकी छोटी चिमुरडी प्रथमच हातात घेत होतो आणि विचार, आचार, मन मेंदू, वगैरे जे काही असते ते सर्व काही त्यांचे अस्तित्व विसरले होते. एक वेगळीच शांतता झाली होती पण त्या शांततेचे एक सुंदर असे संगीत ऐकू येत होते. पार्श्वसंगीत म्हणतो ना आपण तसेच काहीतरी. मी माझा उरलोच नव्हतो. जे काही घडत होते ते काहीतरी खूप ग्रेट होतं. कदाचित स्वर्गाप्रमाणे. पण भन्नाट होता तो क्षण... माझ्या आळशीपणामुळे मी आत्ता जे लिहितोय ते तेव्हाच लिहायला हवे होते. म्हणजे मला जास्त चांगले समजावता आले असते.
सकाळी सातवाजता आम्हाला ऍडमिट व्हायला सांगितले होते. तेव्हापासून ते साधारण साडेदहा वाजेपर्यंत बारीकसारीक चाचण्या आणि तपासण्यासुरु होते. डॉक्टर, नर्स यांच्या ये-जा सुरु होत्या. आम्ही हे नुसते बाजूला थांबून पाहत होतो. सर्व व्यवस्थित आहे असे पाहिल्यानंतर डॉक्टरानी वर्षाला ऑपेरेशन थियेटर मध्ये नेले आणि तिथूनच मी सुन्न पडायला लागलो. त्या खोली बाहेर एक बाजूला बाकडे होते. तिथे वर्षाची आई, मावशी आणि भाऊ बसला होता. मी मात्र बसूच शकलो नाही. तिथेच असलेल्या पॅसेज मध्ये मी फेऱ्या मारू लागलो. त्या खोलीच्या दाराला दोन छोट्या खिडक्या होत्या, त्यातून उगाचाच माझी नजर सारखी आत जात होती. आत मधील कोणतेही दृश्य दिसत नव्हते तरीपण चिंतेमध्ये मी सारखे डोकावून पाहत होतो. आणि शेवटी तो क्षण आलाच. आतमधील नर्सने आम्हाला हाक मारली, आणि आम्ही दारापाशी पळत गेलो. मग आतून एक डॉक्टर आम्हाला आमच्या बाळाला दोन क्षणाकरिता आणून दाखवले आणि
आत निघून गेले... अहो डॉक्टर मुलगा कि मुलगी ?
मग एक नर्स आतून उद्गारली... 'मुलगी'. "लक्ष्मी" वा छान असे आमच्या सासूबाई उदगारल्या !! मला मुलगीच हवी होती... आनंदात माझी दातखीळच बसली, डोळे पाणावले. अशा अवस्थेत मला काही कळतंच नव्हते. वेळ अचानक थांबली आहे असेही वाटत होते. मला बोलताच येत नव्हतं, अगदी मनाशी पण. आम्ही विचारलं की वर्षा कशी आहे. ती छान असल्याचे समजले. बस मग तर आणखीन काय हवे होते. क्षणात आयुष्यच बदलून गेलं होतं. आई बाबांना फोन लावला. ते देखील वाट बघत होते. फोनची रिंग झाली आणि आईने फोन उचलला. ती पण खूप आतुरतेने विचारू लागली आणि इकडे माझे मन इतकं भरून गेल होतं आणि त्यातून आईचा आवाज ऐकताच मी ढसाढसा रडू लागलो. खूप रडलो. तिथे असलेल्या एका जिन्यामध्ये जाऊन चक्क बसलो आणि खूप आनंदात आईला सांगितले की लक्ष्मी आली. आईलादेखील आनंदात अश्रू आवरत नव्हते. अरे वाह खूप छान असे बोलत सगळी विचारपूस तिने केली. मग बाबांना फोन लावला. त्यांची पण तीच अवस्था होती. सर्व काही छान घडत होते. हॉस्पिटलच्या खाली पळत गेलो.बर्फीचे दुकान पळत पळत शोधत होतो. पण सापडलेच नाही. कदाचित मला आनंदात दिसतच नव्हते. गजाला फोन केला. तो त्वरित आला. त्यालादेखील ही आनंदाची बातमी सांगितली व लगेच त्याने मला एका मिठाईच्या दुकानात नेले. भरपूर बर्फी घेतली. त्यादिवशी बर्फी घेण्याचा आनंद काही वेगळाच होता. दवाखान्यात येऊन सर्वांना ती वाटली. एखाद्या पिक्चरच्या सीनप्रमाणे जणू तो हिरो आनंदात सर्वांना बर्फी वाटतो तसेच मी काहीतरी करत होतो. काही वेळातच वर्षाला बाहेर आणले आणि आता तिला बघायला मी आतुर होतो. थोड्याच वेळात मला खोलीमध्ये येऊ दिले. आम्ही दोघेही नजरेनेच एकमेकांशी खूप काही बोलत होतो. वर्षाने याकरीता काय काय सोसले होते ते सारे मला आठवत होते. देव जणू आमची परीक्षाच घेत होता. पण आम्ही कुठेच हार नव्हती मानली. हे सर्व आठवता आठवता डोळ्यांमध्ये अश्रूंचा महासागर झाला होता. खूप दिवसांपासून आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती आम्हाला इतक्या गोड पद्धतीने मिळाली होती. काहीतरी स्वप्नरुपी हे सर्व चालू आहे की काय असे जाणवत होते. पण हे सगळं सत्य होतं.
तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतांना तिने सोसलेल्या अनंत वेदनेची थोडी जाणीव मला होत होती. पण तिच्या चेहऱ्यावर अजिबात तसे दिसत नव्हते. उलट तिच्या मनामध्ये, चेहऱ्यावर, सर्व शरीरावर झालेला आनंदच वाहत होता. काही मिनिटात पिल्लूला तिच्या शेजारी ठेवले. तो क्षण तिलाच काय, मलाही विसरता येणार नाही. एका हाताने अलगद पिल्लूच्या डोक्यावरून व पूर्ण शरीरावरून हात फिरवण्यात ती पूर्ण हरवलेली होती. हा जन्माचा क्षण किती मौल्यवान असतो, एखाद्या आईला कसे वाटत असेल... नऊ महिने जे बाळ पोटात असते त्यानंतर ते या जगात येते आणि जणू ते या पद्धतीने एकरूप होते ... कमालच आहे या सृष्टीची, निसर्गाची ... सलाम आहे या सर्वांना !! त्या प्रत्येक माउलीला... जी अनंत यातना सोसून या सोहळ्याची पूर्तता करते, ते ही तोंडावर हास्य आणि ... आनंद ! कुठून येत असेल हे बळ? कल्पनाच करवत नाही. एक स्त्रीच हे निभावू शकते, यात काही शंकाच नाही.
इतके दिवस, मला जर कुणी असा प्रश्न विचारला की तुझ्या आयुष्यातील सर्वात सुखद किंवा अविस्मरणीय क्षण कोणता, तर मला खूप विचार करावा लागत होता. कारण असे काही खास घडलेच नव्हते. पण आता मला सांगता येईल 4 डिसेंबर २०१७... आता तर तो माझा सर्वात लाडका दिवस आहे आणि हो तुम्हाला कदाचित आठवत असेल, याचदिवशी ओखी नावाचे एक चक्रीवादळ अमेरिकेत आले आणि माझ्या आयुष्यातदेखील... 😊
(आज मातृदिनानिमित्त (१०-५-२०२०) हा माझा अविस्मरणीय अनुभव मी येथे लिहीत आहे.)
Happy Mothers Day !!
🧡🧡🧡
मनातल्या भावना छान व्यक्त केल्या आहेस..अप्रतिम 👌
ReplyDeletethanku samya
ReplyDeleteMastch anubhav. Chhan lihil aahes👍
ReplyDeleteये खुशी हमसे बचकर किधर जायेगी…
ReplyDeleteअक्षय, किती छान प्रकारे उलगडलाय हा सारा प्रवास! मलाही तो दिवस, तो सगळा काळ आठवतोय. फार आनंदी होता. पुन्हा एकदा ते स्मरण रंजन आनंददायी! खूप शुभेच्छा तुम्हां तिघांना!
ReplyDelete