शेवटचे 20 किलोमीटर...

इंटरची (कमर्शिअल आर्ट सेकंड इयर) परिक्षा संपल्यावर, सुट्टीत सायकलवर फिरण्याची खूप इच्छा होती ! पण नेहमीप्रमाणेच काही कारणांनी जमत नव्हतं. अँडव्हान्सचे (तिसरे वर्ष) वर्ष सुरु झाल्यावर प्रवीणची चांगली ओळख झाली होती. आमचा खूप छान ग्रुप झाला होता. नन्या, सनीत, अभ्या, गजा, प्रवीण, वर्षा. अँडव्हान्स खऱ्या अर्थाने दंग्यात जाणार होतं हे नक्की. खूप मजा येत होती. कॉलेजचे आयुष्य, छान रूममेट्स आणि आवडते क्षेत्र.

सुरूवातीपासूनच सायकलवर भटकंती करण्याची मला फार आवड आहे. सायकलवर फिरण्याचे अनेक फायदे आहेत. स्वस्तात फिरता येते, वेळ भरपूर लागत असल्यामुळे अनेक दिवस भटकंती करता येते, प्रवासात भरपूर वेळ असल्यामुळे छान  निरीक्षण करता येते आणि सर्वात महत्वाचे व्यायाम देखील होतो. पुणे ते  कन्याकुमारी पर्यंत जाण्याचं माझं एक स्वप्न होतं ! हे बोलता-बोलता मी प्रवीणला सांगितला आणि त्याने लगेच होकार दिला. मनामध्ये लगेचच एक एक चित्र रंगायला लागले. नकाशे, रस्त्यांचा अभ्यास, पुस्तकं गोळा करण्यास सुरवात केली. सगळेजण ओरडायला लागले की, असं कधी शक्य आहे का... वगैरे वगैरे ! पण आमचा विचार अगदी पक्का झाला होता. कोणकोणत्या गोष्टी लागणार आहे, त्याची लिस्ट करू लागलो. काय-काय बघायचे, कुठे कुठे जायचे, हे आम्ही अभ्यास करु लागलो. हि धडपड चालू असतांना सगळे आमच्याकडे एका वेगळ्याच कुतूहलाने पाहू लागले. एकंदरीत मनांत खूप काहूर माजले होते. जसे जसे दिवस पुढे सरकत होते तसे सगळे मित्र चिडवू लागले. पण आमच ठरलं होतं. जेवतांना-झोपतांना, बाहेर फिरतांना, जाता-येता, कॉलेजमध्ये, महालक्ष्मी मंदिरात, रंकाळ्यावर आमचा एकच विषय 'कन्याकुमारी'.

अँडव्हॉसचे वर्ष तर खुपच रंगतदार, दररोज यायचं .. दंगा मस्ती... गप्पा गोष्टी हे वर्गात सतत चालूच होतं.  त्यामुळे दिवस कसे झरकन गेले हे कळलं सुध्दा नाही. बघता बघता जानेवारी महिना उजाडला आणि आमच्या तयारीला वेग येवू लागला. प्रारंभी सायकलचे काम सुरू झाले. प्रवीणकडे हिरो हॉक बनावटीची सायकल होती. त्यामुळे तिला सर्व सोई अगोदरच होत्या. ...आणि मी मात्र माझी सहावी पासूनची बी. एस. ए . एस. एल. आर.!! सायकल प्रवासासाठी तयार करायची ठरवली. अर्थात ते आव्हान काही सोपे नव्हते. त्या वेळेस वडील जे पैसे पाठवायचे ते साठवून हा उद्योग सुरु झाला. त्या जोडीला मित्रांची साथ आणि जिद्द यामुळे हे आव्हान हळू हळू सोपे वाटू लागले.

प्रवास आरामदायी आणि वेगाने होण्यासाठी सायकलला गियर असणे आवश्यक होते. त्यांसाठी पुण्याहून शिमानु बनावटीचे दोन गियर सेट आणले. तर गियर चेन बेळगांवहून आणली. इतर किरकोळ crank, ब्रेक्स, हॅन्डल, रिम, टायर-ट्यूब, सर्व पान्हे कोल्हापुरातच परमार सायकलमधून भराभरा विकत घेतले. अर्थात या दुकानात आम्ही इतक्या वेळा गेलो की मालकापासून फिटिंग करणारे आमच्या परिचयाचे झाले होते. काही अडले की कॉलेज सुटल्यावर लगेच आम्ही त्यांचे डोके खायला जायचो. आमची आता सायकलची सर्व तयारी झाली होती. इतके पार्ट नवीन आणूनही सायकल मात्र जुनीच दिसत होती. मग सायकल रंगवायचा विचार मनामध्ये डोकावायला लागला. लगेच नवीन असाइनमेंट केल्याप्रमाणे प्रवीणने कलर डिझाईन करून बघितले आणि काळ्या रंगाची निवड केली. आठवड्याभरात सायकलची फ्रेम घासून - पुसून, त्याला झिंक ऑक्साईड लावले. सनीतनेही उत्साहाने सायकलला काळारंग स्प्रे करून दिला. मग काय आमच्या हिरॉईनचा कायापालट झाला. सायकल अगदी चकाचक चमकायला लागली. तिला नवीन स्टीकर, नवी कोरी गेअर फिटिंग केल्यावर सायकल तयार झाली. प्रवीणने लूनाचे स्पीडोमिटर मिळवले. त्यामुळे अंतर आणि वेग बघणे सोयीचे होणार होते. सायकलचे नवीन रूप पाहून मी, प्रवीण आमचे सर्वमित्र जाम खूश झालो. दिवस जसे जसे जात होते तसतसा उत्साह वाढत होता. नवीन शॉर्ट्स आणि टि-शर्ट वगरे आणून थोडी थोडी प्रॅक्टीस चालू झाली. पहाटे उठून पहिल्या दिवशी ५ वाजता गारगोटीरोडवर निघालो. सगळीकडे अंधार! काही म्हणता काहीच दिसेचना. थोडं पुढे गेल्यावर आमच्यामागे ४-५ कुत्री लागली. सायकल वेगाने पळवत तिथून कसेबसे सटकलो. पुढे लागलेल्या घाटमाथ्यावर मस्तपैकी जाऊन थांबलो आणि निश्वास सोडला. परत येईपर्यंत सूर्योदय झाला होता. लोक फिरायला, व्यायामाला बाहेर पडले होते. आम्हांला पाहून सायकल ग्रुप म्हणून ओरडले. त्याच्या समोरून स्टाईल मारत एक- दिड तास सराव केला.

दूसऱ्या दिवशी NH 4 निवडला. सकाळी सकाळी गावातले रस्ते एकदम मोकळे, त्यामुळे आम्ही कोल्हापूरच्या बाहेर अवघ्या पंधरा मिनीटांत पोहोचलो. कोल्हापूरचे प्रवेशद्वार नुकतेच सजवले होते, म्हणजे नवीन रस्ता, नवीन दिवे ते दृश्य खरोखर खूप सुंदर होते. त्यावेळेस जर मोबाईल असते तर तिकडूनच फोटोग्राफी सुरु झाली असती. त्यात धुकं वातावरणामध्ये मजा आणत होतं. जणू मुंबापुरीतले मरीन ड्राईव्हच ! वेळ न घालवता बंगलोरच्या दिशेने आम्ही सराव चालू केला. अंधार असल्यामुळे वाहनांच्या दिव्याचे आम्हाला त्रास होत होते. एका छोट्या पुलावर येताच एका ट्रकने मला रस्त्याच्या कडेला दाबले आणि मी रस्ता सोडून मातीवर... बापरे आणि पुढे खड्डा!! अंधारात खड्डा दिसला नाही आणि पडता पडता तोल सावरत थांबलो. तिकडेच मला घाबरून खुप घाम फुटला. मनात आले की ही ट्रीप वगैरे आपल्याला जमणार का ? पण नाही... तडक उठलो. प्रवीण तोपर्यंत पुढे निघुन गेला होता. त्याला गाठता गाठता दोन प्रोफेशनल सायकलीस्ट आम्हाला खुन्नस देत गेले. त्यांच्या भन्नाट परदेशी बनावटीच्या सायकली पाहून आम्ही जाम खूष झालो. ते प्रचंड वेगाने नाहीसे झाले. नंतर आम्ही जुन्या कागल रोडने परत कोल्हापूरात प्रवेश केला. एका तासातच कोल्हापूरला अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली.

असा मजेत दोन तीन दिवस भरपूर सराव केला. पुढे कॉलेज, सबमिशन, परीक्षेमुळे जमले नाही. त्यातूनही वेळ काढून एकदा बेळगांव, दोन-तीन वेळा सांगली, एकदा इचलकरंजी, नृसिंहवाडी असे दर शनिवार-रविवार आम्ही गाजवले. आमचे दोघांचे ट्युनिंग अगदी छान जमले होते. सायकलीचा वेग, पुढे-मागे, पुढे-मागे असे आम्ही दोघं एकमेकांना प्रोत्साहन देत होतो. त्यामुळे दोघांची मनाची अगदी जय्यत तयारी झाली.

पुढील प्रश्न होता पालकांना पटवण्याचा. दोघांच्याही घरातून नकार घंटा होती. साहजिकच आहे.... आम्ही दोघेच, इतका लांबचा प्रवास! पण आम्ही मुकाटयाने ओरडणं खात होतो. ही ट्रीप आत्ताच केली तर होणार होती, पुढे कधी जमणार माहित नाही. आम्ही पण हट्टाला पेटलो होतो! त्यामुळे आमचे जाणे हे फीक्सच होते. अगदी कॉलेजमध्ये सर्व सर, प्रिन्सिपल यांना देखील माहिती होते. तसे पत्रदेखील घेतले होते. त्यामुळे आमच्या हट्टपायी आणि आम्ही जिथे थांबू तिकडून दररोज फोन करू या बोलीवर आमचे पालक थोडेफार तयार झाले.

पुढच्या काही दिवसात आम्ही प्रवासाकरिता मिलिटरी प्रिंटच्या कापडाची बॅग शिवून घेतली जी सायकलवर सहज बांधता येणार होती. उन्हाळा असल्यामुळे आवश्यक गोष्टींची जमवाजमव सुरु झाली. शुज, टोपी, पाण्याच्या बाटल्या वगैरे असा छोटा छोटा खर्च चालू झाला.

फेब्रुवारी महिना संपून मार्च महिना चालू झाला. आमचे कॉलेजमध्ये सबमिशन आणि त्याकरिता जागरणं सुरू झाली. तो दिवस मला अगदी आठवतोय्. आठवडाभर मी पहाटे पाच-सहापर्यंत जागरण करत होतो आणि त्यामुळे आजारी पडलो. या कारणावरुन वर्षी, सन्या, अभ्याने मला चांगलेच झापले होते. हा असा प्रसंग पहिल्यांदाच घडला होता. असे काळजी करणारे मित्र माझे आहेत याचा मला खूप अभिमान वाटला. तेव्हा खरे मित्र मिळाल्याचे आनंद तर होताच आणि सुरक्षित पण वाटत होते.

पाहता पाहता अँडव्हान्सची (तिसरे वर्ष) परिक्षा संपली होती आणि आम्हाला वेध लागले होते ट्रिपचे. एकीकडे  दोघांचे आई-वडील आम्हाला ओरडू लागले. आता इतकी तयारी झाली होती की मागे फिरणे कठीणच होते. शेवटी आम्ही आमची सायकल रपेट ७-८ दिवसांची आखली. कोल्हापूर-सांगली-अथणी-बिजापूर-अलमट्टी-ऐहोळ-पट्टदकल-बदामी-रामदूर्ग-बेळगांव-गोवा-सावंतवाडी-कोल्हापूर. बेळगावमध्ये आमचे आणखी दोन मित्र आम्हाला भेटणार असे ठरले. तिकडून आम्ही चौघे गोवा फिरणार असा प्लॅन आखला होता.

सर्व विघ्न दूर होत शेवटी निघण्याचा दिवस उजाडला. कॉलेजमधल्या मित्रांनी शुभेच्छा देऊन आपापल्या गावी सुट्टीसाठी गेले होते. हळू हळू सर्व रूम पार्टनर सुट्टीला निघू लागले. गजा बेस्टलक देऊन इचलकरंजीला तर सनीत सांगलीत आमच्या स्वागतासाठी पुढे गेला. तो दिवस होता रविवार ८ एप्रिल, हनुमान जयंती. पहिला मुक्काम सांगली होता म्हणून आम्ही दुपारी चार वाजता निघणार होतो. वर्षा आम्हा दोघांना शुभेच्छा द्यायला आली होती. गप्पा मारता मारता कधी चार वाजले कळलेच नाही. वर्षाने काय करावे तर जवळच्या साई मंदिरातून कुंकू आणले आणि आम्हाला टिळे लावले. या गोष्टीमुळे मला खूप भरून आल्यासारखे झाले, तिच्याशी बोलायला मला शब्दच सापडत नव्हते आणि हे होत नाही तर पुढे काय आश्चर्य, वरती राहणाऱ्या घरमालकीण काकूंनी आणि शेजारच्या काकूंनी आम्हांला ओवाळले आणि सायकलींची पूजा केली, अगरबत्ती लावली, नारळ फोडला. हा सर्व आपलेपणा पाहून माझे मन भरुन आले, प्रसन्न वाटले. या अनोळखी जागी, आई-वडीलांपासून दूर असलेल्या ठिकाणी मी एकटा नाही, हा फार मोठा आधार असतो. ठिकठिकाणी कोल्हापुरात तुम्हाला असे अनुभव नक्की येतील. खूप मदत करणारे, एकमेकांच्या मदतीला धावून येणारे प्रेमळ लोक आहेत कोल्हापूरकर. मोठ्यांचे आशीर्वाद असतील तर कुठलेच काम अवघड नाही यांची पुनः एकदा जाणीव झाली आणि दीर्घ श्वास घेऊन सर्वांचा निरोप घेत-घेत आम्ही सायकलवर स्वार झालो. पव्याला टाळी देत मी म्हणालो "लेटस डू ईट..." आणि त्यानेही टाळी दिली. आता खऱ्या अर्थाने आमच्या ट्रीपची सुरवात झाली. आता खरी कसोटी सुरु झाली. एवढ्या प्रतिक्षेनंतर आमच्या मनासारखे होणार होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता. शेवटी आपले जे स्वप्न असते ते साकार होतांना बघण्यात काही वेगळीच मज्जा असते. सांगली सात पर्यंत गाठायची होती. वर्षाने थालपीठ दिले होते रस्त्यात खाण्यासाठी पण आम्हाला भान होते कुठे ? सरss  सरss चेनचा आवाज होत आम्ही सांगलीला बरोब्बर सात वाजता पोहोचलो. रस्त्यात अनेकजण आमच्याशी बोलत होते. कुठे? कुठून आला ? केंव्हा निघाला? अशा नाना प्रश्नांची उत्तरे देत आम्ही सनीतकडे पोहोचलो. सनीत आमची वाटच पाहत होता. किरकोळ आवश्यक सामान आम्ही सांगलीत घेतले. त्या दिवशी मस्त जेवून लवकर झोपलो. काय माहिती पुढे  प्रवासात एवढी आरामदायी झोप मिळणार होती का नव्हती ?

दुसऱ्या दिवशी चहा-पान करून काका-काकूंचे आशीर्वाद घेऊन बीजापूरच्या दिशेने रवाना झालो. भल्या सकाळी मिरजेच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. हवेत गारवा छान होता. ऊन्हाचा कडाका वाढायच्या आत जास्तीत जास्त अंतर कापण्याचा प्रयत्न आम्ही करणार होतो. साधारण नऊ वाजल्यापासूनच गरमी वाढू लागली. रस्ता तापला होता आणि उन्हामुळे आमचा वेग मंदावला. मिरज सोडल्यावर पुढे रस्ता प्रचंड खराब. साधारण अकरा ते बारापर्यंत अथणीत पोहोचण्याचा अंदाज होता.
थोड्या वेळ विश्रांतीचा क्षण

उन्हामुळे एका झाडाखाली सावलीत थांबलो. जवळचे पाणीही गरम झाले होते. रस्त्यावरुन ऊस भरभरून ट्रक- ट्रॅक्टर जात होते आणि असं वाटत होतं की, एखादा तरी ऊस खायला मिळाला तर किती बरं होईल! तर एकीकडे कधी अथणी येईल आणि आम्ही जेवणावर कधी ताव मारु असं झालं होतं. दोन-चार मिनीटे थांबुन निघू असा विचार करेपर्यंत एका ट्रकमधून काही ऊस पडले आणि थेट आमच्याजवळ येऊन पडले. वेळ न घालवता ऊसाचा आनंदाने फडशा पाडला. त्या दिवशीचा ऊस खाण्याचा आनंद वेगळाच होता. ऊस संपत नाही तोच एक बाई पाणी घेऊन येतांना दिसली. जीवात जीव आला. पोटभर थंडगार पाणी पिऊन आणि जवळच्या बाटल्या भरून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. असे वाटले की हा ऊस आणि पाण्याची व्यवस्था परमेश्वर करतोय. बाप्पा अडचणींच्या वेळी धावून येतो याचा पुन: एकदा प्रत्यय आला.

बाराच्या दरम्यान आम्ही अथणीत पोहोचलो. साधारण ६ तासात आम्ही सत्तर किलोमीटर प्रवास पूर्ण केला आणि कर्नाटक राज्यात प्रवेश केला होता. छोटीशी चेक पोस्ट होती. ती ओलांडून आम्ही गावात पोहोचलो. गावात नुसती गर्दी - गोंधळ - धूळ आणि जोडीला ऊन. पोटात नुसते कावळे ओरडत होते. आता पूर्ण जंगलच ओरडू लागले होते. आता भाषेचाही बदल जाणवू लागला. कन्नड भाषा इथून सुरु झाली. नशिबाने प्रवीण बेळगावचा. त्याला कन्नड येत असल्याने अगदी सोईचे झाले. नाहीतर फारच पंचाईत ! प्रवीण चौकशी करण्यास जायचा, तोपर्यंत गावातले लोक उत्सुकतेने मला प्रश्न विचारुन भंडावून सोडायचे. त्यांना माझी भाषा कळत नव्हती आणि मला त्यांची, अशी गंमत सुरु होती. प्रवीणने तोपर्यंत स्वच्छ हॉटेल शोधले आणि आम्ही पोटभर जेवण केले. अथणीहून प्रयाण केल्यानंतर थोड्याच अंतरावर एक सुंदर झाड आणि त्याची शीतल छाया आमच्या नजरेस पडली आणि त्याच डेरेदार झाडाखाली आम्हाला थांबण्याचा मोह आवरला नाही. जवळच एक देवीचे मंदिर होते आणि समोरच हातपंप. जेवण अंगावर आल्यामुळे मस्तपैकी एक डुलकी मारलीच. झोप तशी लागलीच नाही.

भर उन्हात, दाट सावलीत...

कारण प्रकाश आणि सावलीच्या खेळात प्रकाशच जिंकत होता. वर्षीने डेअरीमिल्क कॅडबरी दिल्याचे आठवले आणि त्याचे खरोखर मिल्क झाले होते. चारच्या सुमारास आम्ही त्या हातपंपावर झक्कास अंघोळी केल्या आणि ताजेतवाने होऊन पुढे प्रवासाला लागलो.

बिजापूर होते साधारण ८० किलोमीटर. रस्ता फारच खराब होता. हळूहळू आमची आगेकुच सुरु होतो. आजुबाजुला पूर्ण शांतता. झाडं, डोंगर कशाचाच पत्ता नव्हता. झळांचा फक्त आवाज कानावर पडत होता. पूर्ण क्षितीजापर्यंत सपाट जमीनच दिसत होती. सगळीकडे वाळवंटासाखे पिवळे धम्मक दिसत होते. खूप लांब अशा  वाळवंटात मला खूप हिरवेगार असे झाड दिसले. त्यामुळे त्या झाडापर्यंत लवकर पोहोचू म्हणून आमचा वेग आपोपच वाढला. तुरळक एखादे वाहन आम्हाला क्रॉस होत होते. काही क्षणात आम्ही पूर्ण ओलेचिंब झालो होतो. मनात पाऊस पडेल का असे येईपर्यंत खरंच काळे ढग सूर्याला व्यापू लागले. बघता बघता काळेभोर आभाळ आले आणि वळवाच्या पावसाला सुरवात झाली. वीजा पण कडाडू लागल्या आणि पावसाने जोर धरला. तोपर्यंत आम्ही त्या झाडापर्यंत पोहोचलो होतो. काही मिनीटात आम्हाला त्या पावसाने भिजवले होते. त्या झाडाच्या मागे एक घर दिसू लागले. ते दिसताच आम्ही आडोश्याला तिथे गेलो. आतून एका म्हाताऱ्या आजीचा आवाज आला "कोण आहे?" आणि काय आश्चर्य... तिथे राहणारी माणसे मराठी होती. आपली मराठी भाषा ऐकून मग खूपच हुश्श वाटले. सुंदर असे कौलारू घर होते. दाराची उंची जेमतेम जमिनीपासून ३ फूट असावी. त्यामुळे छतावरील कौलं अगदी कंबरेपर्यंत लागत होती. आजीनी आतूनच हाक मारून येण्यास सांगितले. ढगाळ वातावरणामुळे अंधारून आले होते. घरामध्ये पूर्ण काळोख होता. कसेबसे आम्ही खाली वाकून आतमध्ये आलो. हाताने चाचपडतच खाली बसलो. आत मध्ये किर्रर्र अंधार. एक छोटी चिमणी (दिवा) पेटवली  होती. त्यामुळे आतील दृश्य आता हळू हळू स्पष्ट होत होते. त्या आजी कुठलीतरी भाजी निवडत होत्या. आतमध्ये शेणाचा वास पसरला होता. हे सर्व समजेपर्यंत आजींनी घरातील मुलीला हाक मारून चहा ठेवण्यास सांगितला. तोपर्यंत आजी आम्हाला नाना प्रकारचे प्रश्न विचारात राहिल्या. कुठून आलात, कुठे जाणार आहे. अरे बापरे सायकलवर कशाला आलात वगैरे... अंधारातच आम्ही चहा पिऊ लागलो. चहामध्ये दूध नव्हते आणि साखरेऐवजी गुळ होता हे लगेच जाणवले. बशीच्या आकाराच्या परातीत आम्ही चहा पित होतो. तो चहा कसाका असेना, पण त्याने मला स्वर्गीय शक्ती आल्यासारखे वाटू लागले. त्या चहामध्ये काहीतरी जादूच होती. चहा पिता पिता मला काहीतरी मानेला ओले ओले वाटू लागले. लक्षात आले की कोणीतरी माझी मान चाटतंय. अंधारातच मला एक रेडकू चाटत होते, हे मला लक्षात आले आणि दचकून मी पुढे सरकलो. पुढे सरकल्यावर मला अजूनच वेगळे चित्र दिसले. एकीकडे कांदा तर दुसरीकडे बकऱ्या, कोंबड्या, म्हशी, २-३ कुत्री, ३-४ मांजरी असे पाळीव प्राणी होते. जसे काही आजी नातवंडांना संध्याकाळी गोष्टी सांगताहेत आणि ते सर्वजण ऐकत आहेत असेच काहीसे मला भासले. खरंच जग किती सुंदर आहे !! हे खरे श्रीमंत आहेत. कुठल्याही अनावश्यक गोष्टी नाहीत की अनावश्यक गरजा. आजीने आम्हाला मग त्यांचा मुलगा मागेच असलेल्या शेतात आहे असे सांगितले...'अगं त्याला बोलावून आण लगेच' असे सांगून सुनबाई लगेच त्यांच्या धन्याला हाक मारायला बाहेर गेल्या. तोपर्यंत आम्ही आजींचा निरोप घेत घराबाहेर येऊन थांबलो. काही क्षणातच भाऊ आले आणि परत सर्व हकीकत आम्ही त्यांना सांगितली. मग जेवायचा आणि राहण्याचा आग्रह होऊ लागला. त्यांची माया आणि आपुलकी पाहून मला कायमचेच इथे राहावेसे वाटू लागले. आजही जगात अशी प्रेमाने विचारपूस करणारी माणसं आहेत, हे बघून खरोखरच खूप बरं वाटलं. इच्छा तर होत होती की इथेच रहावे. पण अंधार वाढू लागला होता. मग भाऊंनी सांगितले की पुढे १५-२० कि.मी. वर ऐगली क्रॉस या ठिकाणी डाव्या बाजूला एक मठ आहे. तिथे तुम्ही थांबा.

 ऐगली क्रॉस येथील मठ 
तिकडे जेवायला देखील धाबे आहेत. त्याप्रमाणे आम्ही सर्वांचा व वाळवंटातील स्वर्गासारख्या त्या जागेचा निरोप घेत मठ शोधण्यासाठी निघालो. ते ठिकाण म्हणजे एका छोट्या दोन वळणांच्या टेकडीवर मठ वजा मंदिर होते. खूप मोठा सभामंडप होता. तेथील पुजारी जसे काही आमचीच वाट पाहत आहेत, असे थांबले होते. त्यांनी लगेचच आम्हाला राहायची परवानगी दिली. सायकलवरून सामान काढणे आणि बांधणे हा एक कार्यक्रमच असे. तिथे मग आम्ही आमची पथारी मांडली. जवळच एक ढाबा असल्याने जेवणाची पण सोय झाली. पाऊस अधून मधून पडतच होता. त्या दिवशी हात-पाय चांगलेच दुखू लागले होते. खोबरेलतेलाने हातापायांची मालिश करून आम्ही निद्रादेवीची आराधना करू लागलो. ही आमच्या प्रवासाची दुसरी रात्र होती. असा आमचा सांगली ते ऐगली क्रॉस बसस्टॉपपर्यंतचा साधारण ११० कि. मी. चा प्रवास झाला.

सकाळी थंडीमुळे लवकर जाग आली. सुमारे सात वाजता आवरुन, मंदिरात दर्शन घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.

मठाच्या स्वागत कमानीचे सुरु असलेले बांधकाम

रस्ते नेहमीप्रमाणे अत्यंत खराबच होते. एखादी बस अथवा ट्रक धडाधड त्या रस्त्याने धूळ उडवत जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बाभळीची झाडे. लोक ती झाडं तोडून घरी नेतांना दिसत होते आणि त्यामुळे रस्त्यावर सगळे काटेच काटे झालेले होते. चाक पंक्चर होण्याची खूप भीती होती. आम्ही सायकल अगदी जपून चालवत होतो. रस्ता खूप सुनसान होता. इथे पण कुत्री आम्हाला त्रास देत होती. आपल्या रथावर योद्धयाने शस्त्र ठेवलेले असते, तसे आम्ही काठ्या ठेवल्या होत्या. कुत्री आमच्या अंगावर यायची आणि आम्ही काठीने हकलायचो.

मधूनच ऊन तर कधी ढग असा खेळ सुरु होता. बिजापूर साठ-सत्तर कि. मी. होते. बघता बघता बिजापूर आम्ही काबिज केले. मला एक खूप सुंदर आणि जुनी मशिद दिसली. लगेच आदिलशहाचे राज्य डोळ्यांसमोर उभे राहिले त्या काळातले लोक, वेशभूषा, भाषा, घोडेस्वार अशी वेगवेगळी चित्र डोळ्यांसमोर उभी राहिली. तिथे मागील बाजूस एक सुंदर असे मोठे कुंड होते. तेथे थोडावेळ पाय सोडून आम्ही छान रिलॅक्स बसलो. तिथे एक खूप सुंदर दृश्य मी पाहिले. सुंदर हिरवट निळा असा खंड्या (किंगफिशर ) पक्षी आमच्या समोर येऊन बसत होता. वेडीवाकड्या हालचाली तो करत होता आणि परत येऊन आमच्यासमोर बसत होता. असे किमान त्याने १० ते १५ वेळा केले. आम्ही मात्र न हालता ते पाहण्यात गर्क झालो आणि अचानक त्याने पाण्यात सूर मारला. पाणी अत्यंत स्वच्छ होते आणि त्यामुळे त्या कुंडाचा तळही दिसत होता. त्या खंड्याने सूर मारला, तळाशी गेला आणि मासा धरला आणि भुरकून उडून गेला देखील. हा सर्व पराक्रम त्याने पापणी मिटण्याच्या आत केला होता. त्यावेळेस आमच्याकडे जर व्हिडिओ कॅमेरा असता तर सर्वांनासमोर तो सुंदर अनुभव दाखवता आला असता. अश्या वेगळ्याच अनुभवाचे स्वप्नवत दर्शन अचानक घडले. पुढे अनेक जुन्या मशिदी, घरे दिसू लागली. त्यात एक खूप मोठी पडकी इमारत दिसली. रस्त्यावर बोर्ड होता पण तो कन्नडमध्ये. त्यामुळे प्रवोणने पट्कन सांगितले की, ती वास्तु आहे 'संगीत महल'.

संगीत महल (खाली आमच्या सायकली दिसत आहेत.)

संगीत महल
लगेचच त्या दिशेने आम्ही गेलो, जसं जसं त्या वास्तूच्या जवळ जात होतो तसं तसं तिचे भव्य दर्शन होत होतं. तो आवाढव्य संगीत महाल पाहून थकवा पूर्ण नाहीसाच झाला. मोठमोठ्या कमानी, प्रचंड मोठे खांब, एक छोटा तलाव पण हे सर्व भग्नावस्थेतेत. संपूर्ण तीन-चार मजली इमारत पाहून त्या काळी त्याची किती शान असेल हे जाणवते. १६०० व्या शतकात आदिलशाह-२ ने आपल्या संगीत प्रेमाकरीत हा महाल बांधला होता. तो सर्व परिसर फिरून, काही फोटो काढून तिथून आम्ही बिजापूर शहराच्या दिशेने निघालो. तेही पूर्ण ताजे तवाने होऊनच. पुढे डावीकडे बिजापूर मुस्लीम युनिव्हर्सिटीची इमारत दिसली. ती पण खूपच सुंदर आहे. पूर्ण आवार स्वच्छ, हिरव्यागार झाडांनी सुशोभित आहे. त्यापुढे सर्व शहराची रचना आहे. शहरात आम्हाला लॉज शोधायचे होते, कारण सगळे सामान घेऊन फिरायला त्रास होत होता. लॉज शोधत असताना अचानक सायकलच्या चाकातून आवाज आला. बघतो तर खिळा घुसला होता. ज्याची भिती होती अखेर तेच झाले. 'पंक्चर... !!' पहिल्यांदा जेवण आटोपले. पंक्चर काढून मग लॉज शोधले. साधारण २ ते ५ मस्तपैकी झोप घेतली. थोडाफार थकवा कमी झाला. साधारण पाच वाजता बिजापूर पाहण्यास बाहेर पडलो. काहीही सामान नसल्यामुळे सायकल एकदम हलकी झाली होती. पुढचे मुख्य आकर्षण होते गोल घुमट !! पण तो  पाहण्याची वेळ संपल्याने, बाकी ठिकाणे व परिसर फिरता फिरता एका किल्ल्यासारख्या वास्तूत गेलो. खूप मोठे  आवार, शांतता आणि संध्याकाळचे गार वारे सुटले होते. त्याक्षणी आमच्या कॉलेजच्या ग्रुपची आठवण आली. तिथे छान गप्पांमध्ये आम्ही रंगून गेलो.

बारा कमानी 
दुसऱ्या दिवशी सकाळी बारा कमानी बघण्यास गेलो. त्या वास्तुमध्ये फक्त बारा कमानीच टिकून असल्याने त्याचे नाव बारा कमानी पडले असावे. त्या वास्तूचे विशेष असे दिसले की त्याचा पाया पंधरा ते वीस फूट आहे. त्यामुळे त्या वास्तूला एक भव्यता आली आहे. तिथून आम्ही प्रसिद्धी गोल घुमट बघायला गेलो. सायकल असल्यामुळे आमचे फिरणे खूपच सोपे होते. रिक्षा करा, बस पकडा असे काही करावे लागत नव्हते.

जसा जसा गोल घुमट जवळ दिसू लागला तस॒तशी आमची उत्सुकता वाढत गेली. त्याची भव्यता जेवढी जवळून दिसते तेवढी लांबून अजिबात जाणवत नाही. गोल घुमटाच्या चारही दिशेला छानशी बाग आहे. सुरवातीला एक म्युझियम आहे. दोन खूप मोठ्या तोफा ठेवलेल्या आहे.
गोल गोल घुमटा आणि परिसर 


त्यांना पाहून त्या काळातील ऐश्वर्यसंपन्नता जाणवते. त्या तोफांचे वैशिष्ट्य असे की त्या कधीच वापरल्या गेल्या नाही. आजतागायत त्या तशाच्यातशा उभ्या आहेत. म्युझियमच्या बाजूने गोल घुमटाला कुठेही आधार नाहीये. भारतातील हा सर्वात मोठा घुमट आहे आणि जगातील दुसरा. आत गेल्यावर आदिलशहा व त्याच्या पत्नीची
एकसंघ दगडात कबर आहे. घुमटात जाण्यासाठी आतूनच पायऱ्या आहेत. बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही कळसावर पोहचलो. तिथून बिजापूरचे दर्शन काही अफलातून दिसते. चारी बाजूनी चार कमानी आहेत आणि घुमटात जाण्यासाठी चार दरवाजे आहेत. घुमटात आत गेल्यावर तिथे असलेल्या बाकावर मस्त बसून निरीक्षण करू लागलो. ज्यांनी हा घुमट पाहिला असेल त्यांना वेगळे सांगायची गरज नाही. पण ज्यांनी पाहिला नाहीये त्यांनी नक्कीच पहा. आणि कल्पना करा की कोणत्याही आधाराशिवाय तो कसा उभा आहे आणि कसा बांधला असेल! १६०० व्या शतकात कसे हे साकार केले असेल आणि तेही असलेल्या सामग्रीमध्ये. आज देखील कोणी ठरवले की गोलघुमट बांधायचा आहे तरी त्यांना अवघड जाईल.

या घुमटाचे वैशिष्टय असे की घुमटाच्या भिंतीजवळ एका ठिकाणी केलेला आवाज सात ठिकाणी स्पष्ट ऐकू येतो. इतकेच नाही तर पूर्ण शांतता असल्यास मनगटावरच्या घड्याळाच्या ठोक्यांचा आवाजही स्पष्टपणे ऐकू शकतो. नेमकी एका शाळेची ट्रीप नुकतीच आली होती आणि त्या मुलांचा नुसता दंगा सुरु होता. त्यामुळे मुलांच्या चिवचिवाटात ते शक्य झाले नाही. सभोवलताचा परिसर मनमुराद फिरून प्रसन्न चित्ताने लॉजवर परतलो.

आता सामान बांधणे आवश्यक होते कारण पुढील प्रवासाला निघायचे होते. जेवण आटोपून पुढील प्रवासास मार्गस्थ झालो. पुढील टप्पा होता ऐहोळ! बिजापूरला निरोप देत ऐहोळच्या दिशेने आम्ही प्रयाण केले. पुढील प्रवास आता सुखकारक होता कारण आता आम्ही नॅशनल हायवे नं १३ वरून जाणार होते. रस्ता एकदम मस्का होता. जास्त ऊन नसल्यामुळे आम्ही दुपारी १२ वाजताच निघालो. नॅशनल हायवेनं १३ बंगलोरपर्यंत असल्यामुळे जड आणि इतर वाहनांची गर्दी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस बाभळीची झाडे होती. अश्या आगळ्या वेगळ्या वातावरणात अधून मधून ब्रेक घेत आम्ही सरबताचा स्वाद घेत होतो.

नॅशनल हायवे नं १३ वरील लिंबू सरबताचा स्टॉप
आमचा प्रवास चालू असताना अनेक ट्रक ड्रायव्हर हात हलवून, हॉर्न वाजवून आम्हाला शुभेच्छा देत होते आणि आम्हीही त्यांना हात उंचावून धन्यवाद देत होतो. यामुळे आमचे मनोबल वाढत होते. कुठलेही छोटें गांव आले, की तेथील लोक आश्चर्याने, कुतूहलाने बघत होते. रस्ता चांगला असल्याने आम्हाला चांगला वेग मिळाला होता. पाचच्या सुमारास चहा ब्रेक झाला. चहा घेताना महाराष्ट्रातला चहा आठवत होता. इकडे अगदी कमी दूध किंवा दूध नसलेला चहा आम्हाला मिळत असे. सूर्यास्त होणार होता आणि पुढचा प्रवास अंधारात करू नये असे ठरले. जवळ जे हॉटेल लागेल तिथेच थांबायचे असे ठरले. जवळच चौकशी केल्यावर अलमट्टी धरण लागणार होते आणि तिथे रहाण्याची सोय आहे असं समजलं. अर्थात ते अंडू -गुंडू प्रवीणच बोलत होता. अलमट्टीपर्यंत साडेसात वाजले आणि पोहोचताच पावसाने जोरात हजेरी लावली. हे पाहून आमचा थांबण्याचा निर्णय योग्य होता यातच समाधान वाटले. भर पावसात शोधाशोध सुरु झाली. एकालॉज मध्ये आम्हाला एक कॉमन हॉल मिळाला. स्वच्छ आणि स्वस्त पण होता. माणशी पन्नास रुपये. पांढऱ्या स्वच्छ चादरी आणि गाद्या पाहून आम्ही लगेचच होकार दिला. रात्री थोडा फेरफटका मारला.

पेटपुजा करत असतांनाचा एक भारी अनुभव सांगतो. आम्ही त्या खाटांवर जेवण येण्याची वाट पाहत होतो. एक सरदारजी आमच्याजवळ येऊन बसला. तो एक ट्रक ड्रायव्हर होता. त्याने आम्हाला रस्त्यात पाहिले होते. आणि परत आम्हाला पाहून खूशच झाला. नंतर त्याने विचारले कि क्या ऑर्डर दिया है? रोटी और सब्जी...? आम्ही मुंडी हलवली. 'छोटू, अपना डिब्बा लेकर आओ, असे म्हणत छोटू मोठा डबा घेऊन आला. मला प्रश्नच पडला आता हा सरदार काय करणार असे विचार करेपर्यंत गरम-गरम जेवण आमच्यासमोर आले. सरदारजीने पटकन आमची रोटी उचलली आणि डब्यात बुडवून आमच्या ताटात ठेवली. 'अब खाओ बच्चा' असे म्हणत असताना ती घरगुती तुपाने माखलेली रोटी पाहून मी वेडाच झालो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तर भारीच होते. इतके समाधान होते त्यांना की काय सांगू. कसे तरी दोन रोटी या पद्धतीने खाऊन आम्ही सरदाराचे आभार मानले. आपल्याच मुलाला जेवण भरवून, आपली काळजी घ्या रे मुलांनो वगैरे सांगून ते त्यांच्या मार्गाला आणि आम्ही आमच्या. काय माणूस होता. ग्रेटच. काही समजच नव्हते काय घडले ते. ही लोक किती विचार करतात आणि किती दिलदार. म्हणजे त्या सरदाराने त्याच्या प्रवासाकरता मस्त डबाभर तूप घेतले होते... कसले भारी ना... अर्थात तो तुपाचा डबा त्याला त्याच्या आई अथवा बायकोने दिला असणार... त्या तुपाची चव नंतर कायमच माझ्या जिभेवर आयुष्याभर रेंगाळत राहील. विचाराच्या गर्दीत लॉजवर परतलो. तेथून अलमपट्टी धरण आणि रेल्वेलाईन मस्त दिसत होती. अधून मधून पाऊस पडतच होता. मधेच एखादी रेल्वे जात होती. बाहेरील नजारा पहात आम्ही कधी निद्रेच्या आधीन झालो हे कळलेच नाही.

नेहमीप्रमाणे सकाळी चहा वगैरे घेऊन ऐहोळच्या दिशेने प्रवास सुरु केला. सोळाव्या शतकातील आदिलशहाच्या काळातून आता आम्ही सातव्या शतकातल्या चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात जाणार होतो. दोन धर्मांचा स्नेह जपणारा आमच्या पुढे एकच रस्ता तो म्हणजे कलेचा, संस्कृतीचा. ढगाळ वातावरणामुळे फारस त्रास होत नव्हता आणि मधेच लिंबू सरबताचा स्टॉप आम्ही घेत होतो. त्यामुळे ताजेतवाने राहिलो. आता आमची सायकल मस्का रस्त्यावरून कच्या रस्त्यावर वळली. साधारण दुपारच्या एक वाजता पहिले मंदिर दिसले. माझे मन आनंदाने नाचू, गाऊ लागले. सायकल कडेला लावून आम्ही त्या मंदिरात गेलो. खूपच शांतता होती. अर्थात या मंदिरांमध्ये देवच नव्हते. फक्त मूर्तिकाम, कोरीवकाम, मंदिरांची रचना हे पाहतच बसावं वाटत होतं. थोडे पुढे गेल्यावर तर दहा-पंधरा मंदिरं दिसली. एकदम अप्रतिम. सगळीकडे मंदिरच मंदिरं आणि सर्व प्रेक्षणीय. कोरीव कामाने नटलेली, खांब, कमानी, मुर्त्या. हे पाहू की ते... काय काय बघू नी काय नको, अशी अवस्था झाली होती. संध्याकाळी ५ वाजता मंदिरं बंद होणार होती. तेथील दुर्गा मंदिर हे विश्वातील सर्वात जुने मंदिर आहे. या परिसरात असा एकूण १२० मंदिराचा समूह आहे. सर्व मंदिराची देखभाल भारत सरकारकडे आहे.

आता आमच्या पोटाला पेट्रोलची गरज होती. एका छोट्या टपरीवजा दुकानात दोन चहा सांगितल्यावर दोन छोट्या वाट्यांमध्ये चहा आला. नेहमीप्रमाणे एकदम बेचव. चहा पूड पण तोंडात येत होती. हे लोक असा चहा कसा पितात काही कळत नाही. पुढे प्रश्न राहण्याचा होता. नशिबाने आम्हाला समोरच गव्हर्नमेंट गेस्टहाऊस दिसले आणि कॉलेजचे पत्र दाखवल्यावर लगेचच ते मिळाले. सर्व सामान सोडवणे हा एक कार्यक्रम असायचा. गेस्टहाऊस खूप मोठे असल्याने आम्ही सायकली अगदी दारात आणून लावल्या. फ्रेश होऊन समोरच एक छोटे मंदिर होते, त्याच्या पायऱ्यांवर गप्पा मारत निवांत बसलो. आम्ही पोहोचायच्या आधी पाऊस पडून गेला होता.  त्यामुळे हवेत गारवा होता. साधारण एक बरी खानावळ तिथे होती. जेवण आटोपून गेस्टहाऊसकडे निघालो. आम्ही पोहोचेपर्यंत तिथे बसभरून माणसे आली होती. त्याचा प्रचंड गोंधळ आणि आरडाओरडा सुरु होता. पण आम्ही प्रचंड दमलेले असल्याने त्या आवाजात आम्ही कधी झोपलो तेही कळले नाही. सकाळी आम्ही उठण्याच्या आधीच सर्व मंडळी गायबही झालेली...

दुर्गा मंदिर

दुसऱ्या दिवशी दुर्गा मंदिरात गेलो. मंदिराचे डिझाईन खूपच अप्रतिम आहे. खूप मोठा पाया आणि त्यावर
अनेक खांबाच्या आधारे असलेला प्रदक्षिणा मार्ग. खूपच सुरेख असा कलेचा नमुना. खूप सुंदर
मूर्तिकाम, छतावर देखील खूप उत्कृष्ठ कोरीवकाम आहे. लांबून कळत नव्हते पण नक्कीच त्या रामायण अथवा महाभारतासारख्या गोष्टी कोरल्या असणार.

असे अतिशय प्राचीन दुर्गा मंदिर पाहिल्यानंतर आम्ही पुढे पट्टदकल येथे निघालो. ते अंदाजे दहा कि. मी. होते. रस्ता अगदीच खराब, लाल मातीचा आणि आजूबाजूला जंगल. भर दिवसा प्रवास होता म्हणून, नाहीतर संध्याकाळ किंवा रात्री येथून जाणं मुश्कीलच आणि भीतीदायक. हिरव्यागार झाडांमधून लाल रस्ता वळणं घेत जात होता. रस्त्यात फार चढउतार नसल्यामुळे आम्ही वेगात निघालो. मध्येच आम्हाला साळींदराचे काटे पडलेले दिसले. नेहमीप्रमाणे रस्त्यात कुत्री पाठीमागे लागली. त्यांना हाकलत १० कि. मी. आम्ही झटदिशी पोहोचलो. लांब पट्टदकलमधील मंदिर नजरेस येऊ लागली. ऐहोळपेक्षा जास्त कोरीव आणि भव्य. सुरुवातीला बिजापूर परिसरात नुसत्या मस्जिदी, इकडे मात्र सगळीकडे अफाट मंदिरे. थोड्या वेळासाठी सायकलवरचे सामान काढणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही सायकल गेटच्या आत ठेवण्यासाठी परवानगी मागितली, पण ती मिळाली नाही. मात्र थोडा वेळ लक्ष देण्याचे त्या सिक्युरिटी गार्डने कबूल केले.
पट्टदकल 

हे सगळं बोलणं प्रवीणच करायचा. मी शांतपणे मजा बघत आणि ऐकत असे. मंदिराच्या आवारातील एक एक मंदिरं बघण्यास सुरूवात केली. बघता बघता आणि फोटो काढता काढता कॅमेऱ्यातला रोलही संपला. दुसरा रोलही संपतो की काय असे वाटू लागले, कारण इतकी अप्रतिम मंदिरं, त्यातली नक्षीकाम, मूर्ती...  सारं काही डोळ्यांचं पारणं फेडणारं ! या सर्व जादुई कलाकृतींचा आम्ही मनमुराद आस्वाद घेत होतो.

पट्टदकल येथील असंख्य मंदिराची रचना 

हे सगळं वर्णन शब्दात करणं खूपच कठीण. ही सर्व मंदिरं कितीही वेळ पाहत बसले तरी कमीच आहेत. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी आम्हाला दिसत होते. हे बघून झाल्यावर पोटपूजा आलीच.आम्हाला जवळच घरगुती हॉटेल सापडले आणि तिकडे चक्क पोहे मिळाले. एका पुणेकराला येथे पोहे मिळण्याचा आनंद काही निराळाच. साहजिकच मग चहा झाला. पूर्ण ट्रिपमध्ये इतका छान चहा आम्हाला कुठेच मिळाला नव्हता. सकाळचे साधारण अकरा वाजले होते आणि पुढचा स्टॉप होता बदामी. आम्ही निघणार तेवढ्यात एम एच ०९ पासिंग असलेली कोल्हापूरची ट्रॅक्स आम्हाला दिसली. ड्रायव्हरशी आम्ही दोन शब्द बोलायला गेलो. त्याला जेंव्हा समजले की आम्ही कोल्हापूरहून सायकलवर आलोय, तो इतका खुश झाला की बस्स. त्याने गाडीतल्या सर्वांना आमच्याबद्दल सांगितले आणि आमचे खूप कौतुक केले. ते देखील नंतर बदामीला जाणार होते.

बदामीच्या मंदिरे, लेणी आणि तलावाचा परिसर

त्यांचा निरोप घेत आम्ही बदामीकडे निघालो. थोडं खाल्ल्यामुळे बरं वाटत होतं. पुढे ३७ कि.मी. जायचं होतं. रस्ता तसा बरा होता पण आता आम्ही दमलोही होतो. माझ्या पोटात उजवीकडे कळ येण्यास सुरूवात झाली होती. हळू हळू ऊन वाढू लागले होते आणि खूप थकवा येत होता. आम्ही दोघेही घामाघूम झालो होतो. मला
माझ्या पूर्वीच्या सायकल ट्रीपची आठवण येत होती. कारण तेव्हा आम्हाला आंब्याची झाडे एव्हढी दिसत होती की, शेवटी आंबा म्हटलं तरी नको वाटायचे. पण येथे मात्र झाडेच नाहीत. सगळा रखरखाट. दमून भागून दुपारी आम्ही एकदाचे बदामीला पोहोचलो. बदामीला मंदिरं, गुहा, लेण्या, तलाव अशा बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. अंगात त्राणच उरले नव्हते. थोडा वेळ सावलीत आराम केला. तेथे आलेले परदेशी लोक आमच्याकडे आश्चर्याने पहात होते. थोड्या वेळानंतर मी उठून जरा आजूबाजूचा परिसर पाहून आलो. तिथे माझी ओळख एका कलकत्त्यात राहणाऱ्या महिलेशी झाली. विशेष म्हणजे त्यांचेही फाईन आर्ट झाले होते आणि त्यामुळेच
मंदिराकडे जाण्याचा जिना 
त्या तिथे सुंदर स्केचेस करीत होत्या. तोपर्यंत प्रवीण जवळच असलेल्या एका म्युझीयमला भेट देऊन आला. मग दोघेही लेणी बघण्यास गेलो. तिकिटघरामध्ये सामान ठेवण्याची सोय झाली. साधारण पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर लेणी दिसतात, आम्हाला आधी सांगण्यात आले होते की चपला, बूट अथवा कोणत्याही वस्तू ठेवून जायचे नाही. नाहीतर तिथली माकडं त्या पळवतात. पण गमतीचा भाग म्हणजे आम्हाला कुठेही माकडं दिसली नाहीत. कदाचित त्यांचा लंच टाइम असेल ! तिथली लेणी मात्र अतिशय अप्रतिम आहेत. लेण्यांमध्ये भव्य विष्णू अवतार आहेत. साधारण दहा फुटी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजूनही इतक्या वर्षांनी हे कोरीव काम जसेच्या तसे कसे राहिले आहे, असा प्रश्न आपल्याला पडेलच ! साधारण १४०० ते १५०० वर्षे जुने हे कलेचे नमुने भारताच्या इतिहासाची ओळख सांगतात. हे त्यावेळेस कसे घडवले असेल असा विचार आपल्या मनात नक्कीच येतो. उंच लेण्यांतून खाली बदामी शहर व तिथला पसरलेला तलाव आणि तलावाचा घाट असा रम्य परिसर पाहण्यासारखा आहे.

दगडी डोंगर आणि याच डोंगरात लेण्या कोरल्या आहेत. 

हा बदामीच्या परिसर पायी फिरून आता थकवा जाणवत होता. पूर्ण शरीर मरगळल्यासारखे झाले होते. तिथून आम्ही हॉटेल शोधण्याच्या तयारीत असतांना पट्टदकलला भेटलेली कोल्हापूरची गँग तिथे आली. ते आले आणि आम्ही निघालो असे झाले. ते आम्हाला पाहून खूप खूष दिसत होते. त्यांची आपसातली चर्चा ऐकू येत होती. आईला पोरं आपल्या आधी आली, लै भारी पोरं आहेत ही दोघं. ते ऐकत ऐकत आम्हीही त्यांना हात करत सायकलवर टांग मारली आणि हॉटेल शोधण्यास निघालो.

मुख्य ठिकाणं बघून झाली होती, आता बेळगावच्या दिशेने वळायचे होते. माझ्या पोटात सकाळपासून थोडे दुखतच होते, ते आता दुखणे वाढले होते पण कुठल्याही परिस्थितीत रामदूर्गला पोहोचणे आवश्यक होते, नाहीतर पुढचा कार्यक्रम विस्कळीत होणार होता. मी पव्याला काही न बोलता, रामदुर्गाच्या दिशेने वाटचाल केली. साडेतीन-चार वाजले होते आणि रामदुर्ग होतं चाळीस किलोमीटरवर. तसंच रडत खडत प्रवास सुरु झाला. एक चुक अशी झाली, खाल्ल्यानंतर कमीत कमी पंधरा-वीस मिनीटं थांबायला हवे होते. आम्ही तसंच निघाल्यामुळे पोटावर जास्त ताण पडत होता. जेमतेम २० कि. मी. पूर्ण होत नाही तोपर्यंत सहा वाजले होते. पाणी पिण्यासाठी थांबलो. दोघांचेही दमलेले चेहरे सगळं सांगत होते. अंधार होतोय म्हणून परत रस्त्याला लागलो. आता मात्र मला खूपच असह्य होत होते. मनही खूप अस्थिर झाले होते. खूप घाम यायला सुरुवात झाली आणि दुसऱ्याच क्षणी मी पडतो की काय असे वाटू लागले. अंगातल्या शेवटच्या शक्तीचा वापर करत होतो. लगेचच मी प्रवीणला हात करून, रस्त्याच्या कडेलाच अक्षरशः आडवा पडलो. डोळे गच्च मिटून पडून राहिलो. त्या शांततेत हृदयाचे ठोके फक्त कळत होते. मी होईल तेवढे रिलॅक्स व्हायचा प्रयत्न करत होतो. डोळे उघडले की डोळ्यापुढे चांदणे चमकत होते. काय करावे हेच कळत नव्हते. एकीकडे खूप अंधार पडायला सुरवात झाली होती. तर दुसरीकडे रस्त्यावर चार-पाच आदिवासी माणसे कोयते, काठ्या घेऊन आमच्या दिशेने येतांना दिसली. प्रवीण काय विचार करत होता काय माहिती ? त्या माणसांना बघून नको ते विचार मनात येण्यास सुरुवात झाली. अगदी नाईलाजाने मी उठलो आणि पुढील २० कि. मी. जाण्यास उठलो. प्रवीण पण हतबल झाला होता. अंधार अधिकच वाढत होता. रस्ते ओसाड, आजूबाजूला मी एखादे मंदिर किंवा घर वगैरे शोधू लागलो. पण कुठेच काही दिसत नव्हते. रस्त्याने आमच्या सायकलींचे खुळखुळे केले होते. पाय आता दगडासारखे झाले होते. लांबून एका जड वाहनाचा आवाज ऐकू आला. तो दुसरा कोणी नसून एका ट्रॅक्टरचा होता. प्रवीणने मला लगेच कल्पना दिली, की या ट्रॅकटरला धरुन पुढे जा. माझ्या मनाला ते पटत नव्हते, पण इतका नाईलाज होता की पूर्ण शरीर गळून गेले होते. हाच एक चान्स होता. काय करु तेच कळत नव्हते. ट्रॅक्टरचा वेग खूप कमी होता. बघता बघता तो लाकडांनी भरलेला ट्रॅक्टर माझ्यापुढे येऊन पुढे जाऊ लागला आणि त्यातला एक लाकडी ओंडका अगदी माझ्या हाताशी आला, जसे काही कोणी मला मदतीचा हात देतहोता. मागच्या बाजूला दोन माणसं बसली होती. रस्त्याला पूर्ण चढ होता आणि मागून प्रवीण ओरडू लागला , बाब्या धर... धर... पण तरीही काय करावे कळत नव्हते. हळूहळू तो ट्रॅक्टर पुढे जाऊ लागला आणि माझं मन एकदम म्हटलं की, आता बास... ओंडका धरच. लगेचच मी तो ओंडका घरला. प्रवीणने हुश्श केले आणि तोदेखील ट्रॅक्टरच्या मागे येऊन एखाद्या ओंडक्याला धरण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला काही हात धरण्यास जागा मिळाली नाही.

साडेसात-आठ वाजले होते. पूर्ण अंधार झाला होता. रस्ता खराब असल्याने तो ट्रॅक्टर आणि मागील ट्रॉली खूप उडवत होती. त्यामुळे माझ्या हाताला खूप कळा येत होत्या. हाताला लागतपण होते. हात पूर्ण बधिर झाला होता. पण हात सोडायचा नाही, असे ठरवलेच होते. मला रामदुर्ग पाच किमी असा बोर्ड दिसला आणि माझ्या जीवात जीव आला. पुढे पाच कि. मी.चा पूर्ण उतार होता. मला अंधारात प्रवीण ट्रॅक्टरच्या पुढे गेल्याचे दिसले. त्या दोन व्यक्ति मला सांगू लागल्या, की पुढे उतार आहे, जा आता... पण मला काही केल्या त्यांची भाषा समजत नव्हती. शेवटी त्यांनी खाणाखुणा करत मला मोडक्या तोडक्या हिंदीत सांगितले कि, डाऊनल है, तुम जातो. मी लगेचच हात सोडला आणि त्या तीव्र उतारावर ट्रॅक्टरच्या प्रकाशात पुढे जाऊ लागलो. हात पूर्ण अवघडला होता. पण कसलेही भान नव्हते. माझे डोळे आता प्रवीणला शोधात होते. अंधारात रस्ता दिसत नव्हता. खड्डे वगैरे काही कळत नव्हते. वेगात मी तो पाच कि. मी. चा घाट उतरू लागलो. प्रवीणला मी आल्याचे समजले असावे आणि त्याने टॉक टॉक आवाज केला आणि मी रस्त्याच्या कडेला येऊन थांबलो. प्रवीण माझ्या नजरेस पडला. दोघांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद होता वीरश्रीचाच जणू  ! एकमेकांना टाळी देत आम्ही पुढे निघालो. रामदुर्गचे दिवे दिसू लागले होते. आम्ही अवघ्या दोन ते पाच मिनिटांतच त्या उतारावरुन तीन चार की. मी. उतरलो होतो. सायकलींमधून निरनिराळे आवाज ऐकू येत होते. पण काही पर्याय नव्हता. तहान लागली होती आणि आम्हाला पुढे एक गुऱ्हाळ दिसले. गुळ करण्याचे काम सुरु होते. अंधारात तेवढेच दिसत होते. आमची सायकल त्या दिशेने  वळली. तिथल्या लोकांनी आम्हाला भरपेट ऊसाचा रस पाजला. शांत बसून आम्ही त्या गुळाच्या वाफांकडे पहात रसाची चवीचवीने मजा घेतली. मनामध्ये एक आनंद होता, कारण एवढ्या थरारक अनुभवानंतर सुखरुप, व्यवस्थित रामदुर्गपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. तिथल्या लोकांशी गप्पा मारुन व धन्यवाद देऊन साधारण रात्री नऊ वाजता रामदुर्गला पोहोचलो. परिसर खूपच खराब होता. छोट्या छोट्या बोळांत फिरून आम्हांला एक लॉज सापडले. त्या खोल्या पण खूप धुळीने भरलेल्या होत्या. अनेक महिने इकडे कोणी फिरकलेले दिसत नव्हते. पण काही पर्यायही नव्हता. भरपूर थकल्यामुळे आता वेगळे काही शोधणे शक्य नव्हते. कसेबसे थोडे जेवण करून लगेचच झोपी गेलो. मिलिटरी ट्रेनिंगप्रमाणे थकवा जाणवत होता. क्षणात आम्ही पंढरपुरात पोहोचलो होतो.

सकाळी सायकलची अवस्था पाहून भडभडून आले. तिला आम्ही इतक्या मेहेनतीने तयार केले होते आणि या खराब रस्त्याने मात्र तिची पूर्ण वाट लागली होती. पुढील स्टॉप होता प्रवीणचे गांव आणि ते म्हणजे बेळगांव... रामदुर्गपासून १०० कि. मी.. विचार केल्यावर असं ठरलं की, सायकल बसच्या टपावर टाकून बेळगांवपर्यंत जायचे. सायकल दुरूस्त करण्याची आणि मग पुढे प्रवास करायचा. बेळगांवात पोहोचल्यावर चंगळच. प्रवीणच्या घरी आरामात पूर्ण एक दिवस विश्रांती घेतली. खाणे पिणे आणि झोपणे. ठरल्याप्रमाणे आमचे दोन मित्र सनीत व गजा बेळगांवला येऊन,  चौघेजण गोव्यात फिरणार होतो. पण कुठल्यातरी कारणांमुळे दोघे आले नाहीत.  शेवटी आम्हीही तिथेच ट्रीपचा शेवट केला. दुसऱ्या दिवशी दोघेही कोल्हापूरला परतलो.


आमच्या दृष्टीने खूप मस्त अशी ट्रीप आम्ही केली. ध्येय होते कन्याकुमारीचे पण ठीक आहे. अनेक अनुभव, अनेक सुंदर कलाकृतींचे दर्शन, निरनिराळे लोक, भरपूर लोकांचे मदतीचे हात, अनेक शिकण्यासारखे अनुभव होते. शेवटचा रामदुर्गचा अनुभव माझ्या दृष्टीने फार थरारक होता. त्यातल्या त्यात शेवटचे वीस कि. मी. मध्ये माझ्या मनाचे चाललेले माझे संभाषण !! कधी मी रस्त्याशी बोलायचो तर कधी रस्ता माझ्याशी, तर कधी मी सायकलशी तर मी माझ्या मनाशी... कुठलीतरी दैवी शक्ती माझ्या पाठीशी होती,असे सारखे जाणवत होते. सगळे अनुभव आमच्या हृदयात कायमस्वरूपी राहतील. मोठ्या प्रवासाची हीच तर खरी सुरुवात असेल...

आगे आगे देखते है होता है क्या... अजून ध्येय तर गाठायचेच आहे 'कन्याकुमारी' !!!

-अक्षय कुलकर्णी
Cover Pic curtsy : www.freepik.com
photo created by jcomp

Comments

  1. Chal jau Kanyakumari.

    Khup bhari lihilays.. Thanks to lockdown.

    ReplyDelete
  2. खुपच छान, अक्षय ..! रात्री सुरुवात केल्यावर उत्सुकता वाचन पूर्ण केल्या शिवाय गप्प बसू देई ना ..!! त्या काळातले काढलेले फोटो लज्जत नक्कीच वाढवतात आणि ते प्रसंगानुरुप छानच टाकले आहेस.निश्चयपूर्वक, निर्धाराने मार्गक्रमण केल्यास ईश्वरीशक्तिचा प्रत्यय येतो हेच खरे ..! चालती बोलती माणसंच ईश्वर समान वाटायला लागतांत. खुपच छान शब्दांकन आणि सौदर्य टिपण्याची देणगी तुला जन्मतःच प्राप्त आहे त्या बद्दल मी काय लिहिणार ..! पुढील उपक्रमांसाठी खुप शुभेच्छा ..! -किरण

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद मामा... तुझ्या शब्दांमुळे खूप प्रोत्साहन मिळाले...

      Delete
  3. अक्षय
    खूप सुंदर वर्णन केले आहेस तुझ्या सायकल ट्रिप चे असे वाटले की मी प्रतक्ष ते बघत आहे ते रस्ते ते सगळ्या भागातील वर्णन वा खूप सुंदर

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद... माफ करा तुमचे नाव सांगाल का ... इथे नाव दिसत नाहीये

      Delete
  4. वाब्या खूपच मस्त वाचून खूप बरं वाटले असे वाटते की अशी एखादि ट्रिप मस्त करावी आपण चोघे जण
    खूप मस्त लिहिले आहेस photos पण मस्त आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. थँक्स धनु... नक्की जाऊया

      Delete
  5. मित्रा अक्षय
    अप्रतिम प्रवासवर्णन.सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. फारच सुंदर अनुभवकथन. लिहीत रहा. छान लिहितोस 👌

    समीर 💐

    ReplyDelete
    Replies
    1. samya thanks... thanks for encouragement

      Delete
  6. Bhari lihilay..
    Sahi...

    ReplyDelete
  7. अक्षय, तुझ्या सायकल सफरीचे कौतुक करावे, की तुझ्या लिखाणाचे, की तुझ्या धडाडीचे ? ...खरोखरच सगळेच खुप छान. अप्रतिम. लिखाणाच्या ओघवत्या शैलीमुळे सगळे डोळ्यासमोर येत होते. फोटोही खुप छान.
    तुला मित्राचीही साथ छान लाभली. बाईक वरूनही तुमची नेहमीच भटकंती सुरु असते. असे अजुनही वर्णन वाचायला आवडेल.
    तुझ्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.
    सौ. स्नेहल तारांबळे. ( निलाक्षी कुलकर्णी )

    ReplyDelete
  8. अक्षय, फारच अप्रतिम प्रवास वर्णन लिहिले आहे जणू काही हा प्रवासाचा आनंद मीच घेत आहे.
    पुन्हा ठरवशील तेव्हा या मित्राला विसरू नको, मी नक्की येईन.

    कधी निघायचे सांग.....
    (भटके वटवाघूळ)

    ReplyDelete

Post a Comment

Please write your name while commenting...thanks in advance
कृपया आपले नाव लिहावे... खूप धन्यवाद...