इंटरची (कमर्शिअल आर्ट सेकंड इयर) परिक्षा संपल्यावर, सुट्टीत सायकलवर फिरण्याची खूप इच्छा होती ! पण नेहमीप्रमाणेच काही कारणांनी जमत नव्हतं. अँडव्हान्सचे (तिसरे वर्ष) वर्ष सुरु झाल्यावर प्रवीणची चांगली ओळख झाली होती. आमचा खूप छान ग्रुप झाला होता. नन्या, सनीत, अभ्या, गजा, प्रवीण, वर्षा. अँडव्हान्स खऱ्या अर्थाने दंग्यात जाणार होतं हे नक्की. खूप मजा येत होती. कॉलेजचे आयुष्य, छान रूममेट्स आणि आवडते क्षेत्र. सुरूवातीपासूनच सायकलवर भटकंती करण्याची मला फार आवड आहे. सायकलवर फिरण्याचे अनेक फायदे आहेत. स्वस्तात फिरता येते, वेळ भरपूर लागत असल्यामुळे अनेक दिवस भटकंती करता येते, प्रवासात भरपूर वेळ असल्यामुळे छान निरीक्षण करता येते आणि सर्वात महत्वाचे व्यायाम देखील होतो. पुणे ते कन्याकुमारी पर्यंत जाण्याचं माझं एक स्वप्न होतं ! हे बोलता-बोलता मी प्रवीणला सांगितला आणि त्याने लगेच होकार दिला. मनामध्ये लगेचच एक एक चित्र रंगायला लागले. नकाशे, रस्त्यांचा अभ्यास, पुस्तकं गोळा करण्यास सुरवात केली. सगळेजण ओरडायला लागले की, असं कधी शक्य आहे का... वगैरे वगैरे ! पण आमचा विचार अगदी प...